- किरण भावे, अर्थस्वातंत्र्य संचालक, AS-44.com
२७ सप्टेंबर २०२५
कधी तुम्ही हा विचार केला आहे का की तुमच्यासाठी “अर्थस्वातंत्र्य” म्हणजे काय?
. बँकेत अमुक कोटी रुपये असणे
. दर महिन्याला काम न करता पैशांचा ओघ सुरू राहणे
. की मग हवं तेव्हा उठणे, हवं तेव्हा प्रवास करणे आणि कोणीही तुम्हाला “उद्या ऑफिसला लवकर या” असे न सांगणे
या सर्व गोष्टी अर्थस्वातंत्र्यामध्ये अंतर्भूत असल्या तरी बहुतेक लोक “अर्थस्वातंत्र्य” याचा अर्थ आर्थिक ताणतणावापासून सुटका असे समजतात, आणि ते खरेही आहे.
हा दिवास्वप्न वाटेल असा टप्पा गाठणे “अर्थस्वातंत्र्य” (AS-44.com) च्या रचनात्मक पद्धतीद्वारे सहज शक्य असले, तरी ते मिळवण्यापर्यंतचा अनेक वर्षांचा प्रवास देखील आनंददायी का नसावा?
काही लोक या प्रवासात स्वतःला कैद करतात. “मी एकदम बचत करणार, खर्च पूर्ण थांबवणार, मग १५ वर्षांनी मजा करीन” – अशी त्यांची भूमिका असते. पण, १५ वर्षांनी तुम्ही अजूनही “मजा करण्याच्या” मूडमध्ये असाल याची खात्री आहे का?
अशा जगण्याला आपण “दात कोरुन पोट भरणे” म्हणतो.
कल्पना करा—तुम्ही इतकी काटकसर केली की आजचे आयुष्य तुम्हाला तुरुंगवासासारखे वाटू लागले. “ना रेस्टॉरंटस्, ना सिनेमा, नाही सुट्ट्या, नाही पार्टी, नाही प्रवास” — फक्त काटकसर आणि गुंतवणूक. आणि या प्रक्रियेत तुम्ही हळूहळू आयुष्यच जगायचे विसरून जाल. उद्याच्या “स्वातंत्र्यासाठी” आज तुरुंगात रहायची गरज नाहीये.
अर्थस्वातंत्र्याचा प्रवास हादेखील स्वतःच एक आनंददायी अनुभव असावा. म्हणजेच, प्रत्येक टप्प्यात तुम्हाला आनंददेखील मिळायला हवा. आर्थिक शिस्त आणि जीवनातील मजा या दोन विरुद्ध गोष्टी (Mutually Exclusive) नाहीत. त्या एकत्र अनुभवता येतात.
उदा.
एखादा छानसा प्रवास करा, पण त्याला “बजेट फ्रेंडली” बनवण्याचा खेळ खेळा.
बाहेर खाण्याचा मोह आवरायचा असेल तर आठवड्यातून एकदा घरच्यांसोबत “रेस्टॉरंट स्टाईल” डिनर करा.
खर्च कमी करण्याला शिक्षा न बनवता एक चॅलेंज बनवा—”या महिन्यात १०% अधिक बचत करू शकतो का?”
यामुळे काय होतं?
तुमचा प्रवास हा एखाद्या खेळासारखा होतो—आणि खेळताना आपण थकत नाही, उलट त्यातील छोटी छोटी उद्दिष्टे साध्य केल्याने उत्साह वाढतो.
इथे मला माझा एक अनुभव आठवतो.
माझे अर्थस्वातंत्र्य मिळवण्यापूर्वी मी ठरवलं होतं की, “पुढचे दोन महिने एकही रुपया फालतू खर्च करायचा नाही.”
सुरुवातीचे काही दिवस छान गेले. मग एक जवळचा मित्र म्हणाला, “चल, बाहेर कॉफीशॉपमध्ये जाऊ या.”
मी लगेच नकार दिला. पण नंतर लक्षात आलं की खरी गोष्ट कॉफी नव्हती – तर त्या गप्पा, तो क्षण, ती भेट महत्वाची होती. आणि ती तर साध्या इराण्याच्या चहाने सुद्धा साध्य होणार होती.
तेव्हा मला जाणवलं—मी पैशांची बचत करतोय, पण त्याबरोबरच आयुष्याचे मौल्यवान क्षण गमावतोय.
आणि तेव्हाच मी नियम बदलला:
“पैशांचा खर्च करायचा, मात्र त्यात जाणीव ठेवायची.” म्हणजे प्रत्येक खर्चामागे कारण स्पष्ट असलं पाहिजे.
ज्यांनी माझे “अर्थस्वातंत्र्य” चे सेशन ऐकले आहे, त्यांना आपल्या अर्थस्वातंत्र्यच्या ३०-३०-३०-१० या magic formula बद्दल माहित आहे.
३०% बचत व गुंतवणूक, ३०% गृहकर्जाचा हप्ता किंवा गृहकर्ज नसेल तर आणखी गुंतवणूक, ३०% आवश्यक खर्च, आणि १०% फक्त मनोरंजनासाठी.
हे १०% मनोरंजनासाठी वेगळे ठेवले आहेत, कारण प्रवास मजेदार ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. जोपर्यंत तुम्ही ढोबळ मानाने हा फॉर्मुला पाळत आहात, तोवर तुमचा प्रवास योग्य दिशेने होत आहे याची खात्री बाळगा.
या प्रवासात तुमच्या जोडीदाराची साथ अत्यंत महत्वाची आहे, कारण तुमच्या आजच्या या कृती आपल्या कुटुंबाचे भवितव्य ठरवतात.
मित्रांनो, अर्थस्वातंत्र्याचा हा प्रवास एखाद्या मॅरेथॉनसारखा आहे. तुम्ही ४२ किमी धावत असाल आणि प्रत्येक पावलावर “कधी संपणार” म्हणून कुरकुरत असाल, तर तुम्ही स्वतःला छळत आहात. पण जर तुम्ही प्रत्येक टप्पा एन्जॉय करत, मधल्या क्षणांचं कौतुक करत, लोकांना हात हलवत धावत असाल, तर तो प्रवास तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहील.
एखाद्या प्रवासात गाणे, गप्पा, आवडत्या लोकांचा सहवास आपल्याला प्रवासाचा इतका वेळ कसा गेला आणि आपल्या इच्छित स्थळी कधी आलो, हे कळत नाही.
तुम्हाला अर्थस्वातंत्र्य हवंय का? नक्कीच हवंय!
पण त्याहून महत्वाचं म्हणजे — तो प्रवासदेखील मजेदार करणे तुमच्या हातात आहे.
आजपासून ठरवा—
“मी केवळ अर्थस्वातंत्र्य मिळवणार नाही, तर त्या मिळवण्याच्या प्रवासातील प्रत्येक दिवसदेखील आनंददायी करणार आहे.”
आणि बघा, तुमचं आर्थिक स्वातंत्र्य मिळवणं किती सहज होतं ते!
तुम्हाला हा लेख कसा वाटला ते मला WhatsApp वर नक्की कळवा!
— किरण भावे
अर्थस्वातंत्र्य संचालक, AS-44.com
२७ सप्टेंबर २०२५
9322324698 (Whatsapp)